मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने बोलावलेल्या बैठकीत ६० पैकी केवळ ३७ आमदार उपस्थित राहिल्याने चर्चांना पेव फुटले आहे.
या बैठकीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी हीच खंत बोलून दाखवत महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत असे म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का? असा सवाल उपस्थित केला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत राष्ट्रवादी कांग्रेस शपचे प्रमुख शरद पवार, शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह संजय राऊत, शशिकांत शिंदे आणि सतेज पाटील उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
विधिमंडळात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे, सभागृहात आणि सभागृहाबाहेर संयुक्त भूमिका घेणे तसेच सर्व घटक पक्षांमध्ये अधिक समन्वय राखण्यावर भर देण्यात आला. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला.
