मंडणगड : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाप्रती आदर, सन्मान आणि लोकशाही मूल्यांची जाणीव दृढ करण्याच्या उद्देशाने मंडणगड येथे २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘संविधान सन्मान सोहळा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.
मैत्री फाउंडेशन मंडणगड यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा सोहळा सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, मंडणगड येथे संपन्न होणार आहे. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानातून प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूलभूत मूल्ये प्राप्त झाली आहेत. संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे, या भावनेतून संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता भारतीय संविधानातील मूल्यांचे स्मरण करून देणारा आणि संविधानाविषयी सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा दिवस ठरावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला मंडणगड तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, युवक आणि संविधानप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मैत्री फाउंडेशन मंडणगडचे सर्व पदाधिकारी व हितचिंतक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंडणगडमध्ये २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान सन्मान सोहळा २०२६’चे आयोजन…!
