दापोली : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एन्. डी. गोळे हायस्कूल, हर्णे येथे विद्यार्थ्यांसाठी “सुरक्षितता, सजगता आणि स्वसंरक्षण अभियान” या विषयावर मंगळवारी दि ४ ऑगस्ट रोजी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरसकर पोलीस उपनिरीक्षक ,श्री.राजकुमार यादव, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रकाश मोरे, पोलीस नाईक श्री. दिनेश मोहिते यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. राजकुमार यादव यांनी ऑनलाइन शॉपिंग, डिजिटल व्यवहार, APK फाईल्स, ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून होणारी फसवणूक, सायबर गुन्हे तसेच वाहतूक नियमांचे पालन याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट, वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित प्रवासाचे महत्त्वही पटवून दिले.
यानंतर पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरसकर यांनी सायबर सुरक्षा, बँक खाते, एटीएम, OTP, पासवर्ड सुरक्षितता, लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायद्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र मेहेंदळे सचिव श्री दिनेश मोहिते शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत गुरव,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षितता आणि कायद्याविषयी जनजागृती निर्माण
होण्यास मदत झाली.
