जळगाव:- मुंबईत गुन्हेगारांच्या टोळ्या खुलेआम गोळीबार करत आहेत, खंडणीखोरांचे धाडस वाढले आहे आणि आता तर मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाच्या तपासात अनियमितता आढळून आली आहे. गृहखाते नेमके करतेय काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, एकेकाळी मुंबई पोलिसांची तुलना ही लंडनच्या स्कॉटलंड यार्डशी केली जायची आणि आज काय अवस्था झाली आहे ? जे पथक खंडणीखोरांना वठणीवर आणण्यासाठी नेमले आहे, त्याच पथकाच्या कामकाजावर संशय निर्माण होत असेल, तर महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे हे लक्षण आहे! मुंबई पोलीस यंत्रणेला ही वाळवीच लागली आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल असं त्या म्हणाल्या. मुंबई पोलिसांच्या या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. जनतेला सत्य कळलेच पाहिजे! अशी मागणी त्यांनी केली.
