मुंबई- देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तास्थापन करुन प्रादेशिक पक्षांना नामोहरम करणाऱ्या भाजपचा आगामी काळात सामना करण्याच्यादृष्टीने शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चेने सध्या जोर धरला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यादृष्टीने विचारमंथन सुरु असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही हायकमांडने दिल्लीला बोलावल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
नाना पटोले यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पटोले यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिला होता. मात्र, काही कारणास्तव त्यावर निर्णय घेण्यास उशीर झाला. आता देशातील राजकारणात जे काही चाललं आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चालली आहे. अशावेळी सेक्युलर मतांचं विभाजन थांबवण्यासठी, देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवायला, जे काही सेक्युलर विचारांचे पक्ष आहे, त्यांनी एकत्रित यावे, अशी प्रक्रिया सुरु झाली आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. भाजपला रोखण्यासाठी देशपातळीवर सेक्युलर आघाडी उभी करण्यासाठी पवार साहेब, तृणमूल काँग्रेस हे सगळे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करायचं, या मानसिकतेत आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी या सगळ्यांकडून यासंदर्भात विचारमंथन सुरु आहे. सेक्युरल मतांना एकत्रित करणे, सेक्युलर विचार संपवणाऱ्या मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणे ह एकमेव अजेंडा आहे. मोदी सरकारकडून देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचं आणि पाळंमुळं खोदण्याचं काम सुरु आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.