मुंबई : ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या निवडणूक आयोगाच्या कारभारासंदर्भातील वृत्तावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या १० महिन्यांत दोन निवडणूक आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर तब्बल १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा समोर आल्यानंतर राज ठाकरे यांनी आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्ताचा संदर्भ देताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या आधी राज्यातील विरोधी पक्षांचे नेते राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटत असताना त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचे जाणवत होते. निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आपण आणि आपल्या पक्षाने यापूर्वीही जाहीरपणे शंका आणि आरोप व्यक्त केले होते, असे त्यांनी सांगितले.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत किमान १४ वेळा निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर औपचारिक आक्षेप नोंदवले. हे आक्षेप मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे आणि पुन्हा समाविष्ट करणे, ‘फॉर्म ६’मधील बदल, मतदारयादीशी संबंधित सॉफ्टवेअर तसेच मतदारांच्या डेटाबेसच्या व्यवस्थापनाशी संबंधित बाबींवर होते.
याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित केला. “निवडणूक आयोग स्वायत्त असायला हवा, हे आता पुस्तकापुरतं मर्यादित आहे. स्वायत्ततेची व्याख्या भारतीय जनता पक्षाच्या अधीन अशी असेल तर तो स्वायत्त आहे, अन्यथा नाही,” अशी टीका त्यांनी केली.
सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी नोंदवलेल्या आक्षेपांचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी हे आक्षेप गंभीर असल्याचे म्हटले. आयोगातील दोन आयुक्तांच्या मताला योग्य महत्त्व न देता निर्णय घेतले जात असल्याचे या वृत्तातून दिसून येते, असा दावा त्यांनी केला.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, दोन्ही निवडणूक आयुक्तांनी काही निर्णय त्यांच्या माहितीशिवाय किंवा मंजुरीशिवाय घेण्यात आल्याबाबत आक्षेप नोंदवले होते. नव्या मतदारांच्या नोंदणीसंदर्भातील ‘फॉर्म ६’मध्ये करण्यात आलेल्या बदलांवरही आक्षेप घेण्यात आला होता. तसेच मतदारयादीशी संबंधित डिजिटल प्रणाली अधिक केंद्रीकृत करण्याबाबतही दोन्ही आयुक्तांनी चिंता व्यक्त केली होती.
गोव्यात स्थानिक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करून काही मतदार पात्र असल्याचे निश्चित केले होते; मात्र संबंधित नावे मतदारयादीत पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरची सुविधा वेळेत उपलब्ध न झाल्याने अंतिम यादीत त्यांची नावे आली नसल्याचा मुद्दाही वृत्तात नमूद करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमधील मतदारांशी संबंधित अपील प्रक्रियेचाही राज ठाकरे यांनी उल्लेख केला. मतदारयादीतील बदल, स्थानिक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांचे अधिकार आणि केंद्रीकृत सॉफ्टवेअरच्या वापराबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “ज्ञानेश कुमार हे फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झाले. त्यानंतर बिहार, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुकांचे निकाल आपण पाहिले आहेत.”
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आपण यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले होते, असे त्यांनी सांगितले. “थोडक्यात काय तर, ‘मॅच फिक्सिंग’ सुरू होतं, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसकट सगळे पक्ष बोलत होते आणि ते पुराव्याने सिद्ध झालं आहे,” असा दावा राज ठाकरे यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करताना राज ठाकरे यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार या निर्णयांमागे असलेल्या व्यक्तीचीही चौकशी करण्याची मागणी केली. “मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याशिवाय आता पर्याय नाही. त्यांच्या मागच्या बोलवत्या धन्याचीही चौकशी व्हायला हवी,” असे ते म्हणाले.
दोन निवडणूक आयुक्तांनी नोंदवलेल्या आक्षेपांबद्दल त्यांचे अभिनंदन करत राज ठाकरे म्हणाले की, “पाठीचा कणा ताठ ठेवून आक्षेप नोंदवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन असेच अनेक अधिकारी आता बोलायला सुरुवात करतील.”
‘द इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचेही त्यांनी अभिनंदन केले. “त्यांनी दाखवलेली पत्रकारिता खरंच वाखाणण्याजोगी आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधातील लढा अधिक ताकदीने आणि एकजुटीने लढण्याचे आवाहन त्यांनी सर्व विरोधी पक्षांना केले. “पहिली लढाई ही निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आहे. ती अधिक ताकदीने आणि एकजुटीने करावी लागेल,” असे त्यांनी म्हटले.
ईव्हीएमच्या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. “स्वायत्त नसलेला निवडणूक आयोग आणि ईव्हीएम ही दोन अस्त्रं आहेत या भाजप सरकारची,” असा आरोप करत त्यांनी सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी जनआंदोलन उभे करण्याचे आवाहन केले.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. “जर निवडणूक आयोग अपेक्षेप्रमाणे स्वायत्त झाला तर आणि तरच सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणता येईल,” असे राज ठाकरे यांनी म्हटले.
दरम्यान, The Indian Express च्या वृत्तानंतर निवडणूक आयोगाच्या अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबत राजकीय वाद निर्माण झाला आहे. आयोगाने मात्र या आक्षेपांना निर्णयप्रक्रियेचा भाग असल्याचे सांगितले असून, महत्त्वाचे निर्णय पूर्ण आयोगाने एकमताने घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
