चिपळूण : चिपळूण तालुक्यातील आकले येथील मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेचा गुणवंत खेळाडू कु. आदित्य प्रदीप जाधव याची ३ री भारतीय सब ज्युनियर अथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६-२७ साठी निवड झाली आहे. ही स्पर्धा दिल्ली येथे होणार असून, आदित्यची ५ किलोमीटर चालणे (Race Walking) या प्रकारात निवड झाल्याने विद्यालयासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदित्यच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून, त्याच्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर मजल मारल्याने हा परिसरासाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. बळीरामराव शिंदे, उपाध्यक्ष श्री. नरसिंगराव शिंदे, सचिव श्री. अविनाश जागुष्ठे, खजिनदार श्री. कौस्तुभ जागुष्ठे, हिशोब तपासणी श्री. विजय टाकळे तसेच सर्व संचालक मंडळाने आदित्यचे अभिनंदन केले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजू रामचंद्र वाघमारे, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

संस्थेचे अध्यक्ष श्री. बळीराम तानाजीराव शिंदे यांनी आदित्यच्या कठोर परिश्रमाचे कौतुक करत पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तर मुख्याध्यापक श्री. संजू रामचंद्र वाघमारे यांनी आदित्यचे यश हे विद्यालयासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

आदित्यच्या या यशामुळे दसपटी परिसरात सर्वत्र कौतुकाची भावना व्यक्त होत असून, आगामी स्पर्धेतही तो उत्तम कामगिरी करून विद्यालय आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.