मुंबई प्रतिनिधी : सध्या देशभरात गाजत असलेल्या राजेश एक्स्पोर्टस् आणि त्यातील संशयित राजेश मेहता प्रकरणात १५.१५ लाख कोटींचा घोटाळा, सरकारची फसवणूक याबाबत तुमचा बुलंद आवाज उठवावा अशा आशयाचे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांना लिहिले आहे.

संजय राऊत यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, देशभरातील अनेक घोटाळे, भ्रष्टाचाराची प्रकरणे यावर आपण आवाज उठवत असता. अनेकदा भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीविरोधात धरणे धरता, त्यांच्या घरातही घुसता. हे देशासाठी महत्त्वाचे आहे.

सध्या देशात एक गंभीर आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सेबीने ३ जून २०२६ रोजी राजेश एक्स्पोर्टस् लिमिटेड आणि त्याचे प्रमोटर तथा अध्यक्ष राजेश मेहता यांच्याविरुद्ध अंतरिम आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, कंपनीने आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षात सुमारे १५.१५ लाख कोटी रुपयांच्या महसुलाची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. यातील ९७ ते ९९.८ टक्के महसूल विदेशी सबसिडियरी कंपन्यांमधून (विशेषतः स्वित्झर्लंडमधील व्हॅलकॅम्बी एमए) दाखवला गेला आहे. हा कंपनीचा व्यवहार व आर्थिक उलाढाल संशयास्पद आहे. याशिवाय खोट्या व्यापारांच्या नोंदी, प्रमोटरच्या खात्यात बेकायदेशीर निधी हस्तांतरण आणि इतर गंभीर अनियमितता आढळल्या आहेत.