लांजा : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत लांजा तालुक्यातील पुनस येथे उद्या शनिवार १४ मार्च रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराच्या माध्यमातून भूमि अभिलेख कार्यालयाशी संबंधित विविध डिजिटल सेवांचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे. तसेच नगर भूमापन, गावठाण भूमापन व स्वामित्व अंतर्गत फेरफार प्रकरणे, भूसंपादन व अकृषिक प्रकरणांमध्ये कमी-जास्त पत्रके तयार करणे, ई-मोजणी २ प्रणाली, महाभूमी पोर्टलविषयी माहिती, तुकडेबंदी कायद्यातील बदल याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच जनजागृती, नागरिकांशी थेट संपर्क तसेच प्रात्यक्षिकांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
पुनस कडूवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये उद्या सकाळी साडेदहा वाजता शिबिराला सुरुवात होणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी पुनस मंडळातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लांजा भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक नरेंद्र गोरे यांनी केले आहे.