चिपळूण (सुनील साळवी) : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आपली निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी व सर्व सहकाऱ्यांचे आपण अत्यंत ऋणी आहोत अशा शब्दात राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री तथा रायगडचे नूतन पालकमंत्री श्री भरतशेठ गोगावले यांनी दैनिक सागरशी बोलताना आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली.

प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आपल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आणि रायगडच्या विकासासाठी अधिक जोमाने प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. पालकमंत्री म्हणून त्यांची निवड जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या व्यस्त नियोजनामध्येही त्यांनी दूरध्वनी वरून दैनिक सागर प्रतिनिधीशी बातचीत केली.

गेल्या अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नव्हता. कोकण विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्या बदल्यात पालकमंत्री पद शिवसेनेला अशी महायुतीमध्ये तडजोड झाली होती. त्यानुसार पालकमंत्री पद गोगावले यांनाच मिळेल अशी चर्चा होती मात्र हा तिढा काही सुटत नव्हता अखेर मुख्यमंत्री कार्यालयाकडून रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री गोगावले यांची निवड जाहीर होताच रायगडमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि भंडारा उधळून आनंद साजरा केला.