रोहा : तालुक्यातील एका शाळेतील विकासकामांच्या श्रेयावरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनावरून सुरू झालेल्या वादात शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्यावर श्रेय लाटण्याचा आरोप केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे मनोजकुमार शिंदे यांनी दळवी यांच्यावर टीका केली. या टीकेला आता शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथील शिवसेना संपर्क कार्यालयात मंगळवारी (दि.६) पत्रकार परिषद घेत आक्रमक प्रत्युत्तर देत मनोजकुमार शिंदे यांना थेट इशारा दिला आहे.
“आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका करण्याची मनोजकुमार शिंदे यांची पात्रता नाही,” असा घणाघाती पलटवार राजा केणी यांनी केला. एवढ्यावरच न थांबता, “मनोजकुमार शिंदे यांनी पक्षावर किंवा आमच्या नेत्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी आपणही प्रयत्न केले होते. मात्र, या कामाचे संपूर्ण श्रेय खासदार सुनील तटकरे घेत असल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी केला होता. त्यावरून राष्ट्रवादीकडून मनोजकुमार शिंदे यांनी दळवी यांच्यावर टीका केली. या टीकेमुळे दोन्ही पक्षांमधील आधीपासून धुमसत असलेल्या राजकीय संघर्षाला पुन्हा तोंड फुटले आहे.