खेड : रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमधील इ. दहावीचा विद्यार्थी कु. आयुष जाधव याने नुकतीच जम्मू-काश्मीर येथे पार पडलेल्या ७० व्या राष्ट्रीय शालेय तायक्वाँदो अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये रौप्यपदक पटकावण्याचा मान मिळवला. राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवणाऱ्या आयुषने राष्ट्रीय स्तरावरही आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडली आहे.
दि. ०७ ते ०९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अकोला येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वाँदो स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या ६३ किलो वजनी गटात आयुष जाधव याने उत्कृष्ट कामगिरी केली. लातूर, अमरावती, नाशिक, नागपूर, पुणे आणि मुंबई विभागातील प्रतिस्पर्धकांवर मात करत त्याने सुवर्णपदक पटकावले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान निश्चित केले. राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर आयुषने जम्मू-काश्मीर येथे झालेल्या ७० व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी करत रौप्यपदक मिळवण्याचा मान पटकावला. राज्यस्तरावर सुवर्णपदक आणि राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक अशी उल्लेखनीय कामगिरी करत आयुषने आपल्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित सिद्ध केले. त्याच्या या यशामुळे खेडच्या क्रीडा क्षेत्राच्या नावलौकिकात भर पडली आहे. आयुष जाधवच्या उल्लेखनीय यशामागे क्रीडाशिक्षक कृणाल चव्हाण आणि तायक्वाँदो मार्गदर्शक पंचशील चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्था चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयुषचे अभिनंदन केले.
रोटरीच्या आयुष जाधवची राष्ट्रीय शालेय तायक्वाँदो स्पर्धेत रौप्य भरारी…!
