दापोली :- सकल हिंदू परिवार, दापोली यांच्या वतीने आज दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी ध्वनी प्रदूषणामुळे होणारा त्रास, रस्त्यावरील पार्किंग मुळे रदारीला होणारा अडथळा आणि POP मूर्तीचे उत्पादन, विक्री व नैसर्गिक पाण्यात विसर्जन बंदी बाबत कारवाई करणे अशा आशयाचे निवेदन सकल हिंदू परिवार दापोली तर्फे दापोली पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. सदर निवेदन पोलीस निरीक्षक दापोली यांच्या वतीने उपनिरीक्षक राजकुमार यादव यांनी स्वीकारले.
या निवेदनात म्हटल्यानुसार-
गणेशोत्सव व नवरात्र उत्सव तसेच वैयक्तिक अथवा कोणत्याही धर्मियांच्या उत्सव काळात खालील बाबींची सक्तीने अंमलबजावणी व्हावी असे नमूद करण्यात आले आहे.त्यानुसार,
१) ध्वनी प्रदूषणाबाबत : कोणत्याही मंडळाने सायलेन्स झोन (रुग्णालय, शाळा, न्यायालय, धार्मिक स्थळापासून १०० मी.) मध्ये लाऊडस्पीकर/DJ/ डॉल्बी लावू नये, निवासी भागात दिवसा ५५ dB व रात्री ४५ dB, सायलेन्स झोनमध्ये दिवसा ५० dB व रात्री ४० dB पेक्षा जास्त आवाज नको. रात्री १० ते सकाळी ६ लाऊडस्पीकर पूर्ण बंद. शासनाने जाहीर केलेल्या १५ दिवसांच्या सवलतीत (गणेशोत्सव ४ दिवस, नवरात्र अष्टमी/नवमी २ दिवस, इ.) सुद्धा रात्री १२ नंतर बंदी कायम राहील. प्रत्येक पोलीस ठाण्यातील डेसिबल मीटरचा वापर करून मोजमाप करावे,
२) रस्ते व पार्किंगबाबत : मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की सार्वजनिक रस्ता व फूटपाथवर नागरिकांचा चालण्याचा मूलभूत हक्क आहे, कोणीही उत्सवाच्या नावाखाली रस्ता अडवू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही मंडळाने रस्त्यावर बॅरिकेड्स, मंडपाचे खांब, अनधिकृत पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये. आगमन व विसर्जन मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात, वाहतुकीस अडथळा न करता काढाव्यात.
३) POP मूर्ती बाबत : CPCB दि. १२/०५/२०२० च्या GR नुसार POP मूर्तीचे उत्पादन, विक्री व नैसर्गिक पाण्यात विसर्जन बंद आहे. तरीही बाहेरून येणाऱ्या POP मूर्ती चेक नाक्यावर तपासून रोखाव्यात.
तरी आपण दापोली तालुक्यातील सर्व मंडळांची बैठक घेऊन वरील सर्व शासन निर्णय व न्यायालयीन आदेशांची जाणीव करून द्यावी व उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ ध्वनी प्रदूषण नियम व मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन सकल हिंदू परिवाराचे प्रमुख मिलिंद शेठ, प्रसाद फाटक, प्रा .अमित देवगिरीकर, हेमंत जोशी, सुनंदन भावे आणि शिरीष मेहता या शिष्टमंडळाने सादर केले.