लोटे : ‘ गणेशोत्सव काळात मुंबईतून अनेक कोकणवासीय कोकणात येतात. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी असते. अशा काळात या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी केलेली असते. अशावेळी आपल्या कारखान्यांमधून पक्क्या व कच्च्या मालाच्या अवजड गाड्या कारखान्यातून बाहेर सोडू नयेत तसेच रसायनाचे टँकर सुद्धा बाहेर सोडू नयेत,’ असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी लोटेतील उद्योजकांना केले. लोटे औद्योगिक वसाहती मधील उद्योग भवन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांबरोबर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.
कोकणातील गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हजारोंच्या संख्येने मुंबईतील गणेश भक्त चाकरमणी या उत्सव काळात कोकणात येत असतात. काही गणेश फक्त एसटी बसने, काही रेल्वेने तर काही खाजगी कारने प्रवास करतात. परिणामी गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधीच या महामार्गावर वाहनांची गर्दी होऊ लागते. अशावेळी एखाद्या ट्रेलर किंवा रसायनाने भरलेल्या टँकरचा अपघात या महामार्गावर झाला तर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ शकते प्रसंगी एखादी दुर्घटना सुद्धा घडू शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस आणि महामार्ग पोलीस यांचे कडून विशेष खबरदारी घेऊन या काळात महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली जाते.या खेरीज कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना अपघात समयी तातडीची मदत मिळावी, होणारी वाहतूक कोंडी पोलिसांच्या हस्तक्षेपाने तात्काळ सुरळीत व्हावी यासाठी महामार्गावर अनेक ठिकाणी पोलिसांच्या छावण्या उभारलेल्या असतात. याही वर्षी मुंबई गोवा महामार्गावर संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज असून अनेक ठिकाणी रुग्णवाहिका आणि चालकांसाठी विश्रांती घेण्यासाठी पार्किंग व्यवस्था त्याचबरोबर विशेष रहदारीच्या ठिकाणी होमगार्ड आणि स्वयंसेवक तैनात केले जाणार आहेत, असे पोलीस अधीक्षक बगाटे यांनी सांगितले. या बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे,खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, लोटे पोलीस दुरक्षेत्राचे स.पो.नि. नरेंद्र बेलदार रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, रत्नागिरी जिल्हा फेडरेशन ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन, लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, उद्योजक राजकुमार जैन, राजेश तिवारी, अजित आगवेकर, मंदार आडीवरेकर, शिरीष चौधरी यांच्यासह शेकडो उद्योजक त्याचबरोबर खेड तालुका ट्रान्सपोर्ट असोसिएशन, चिपळूण खेड तालुका वाहतूकदार संघटना यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.