मुंबई : ज्यांची धाव आणि ज्यांच्या पक्षाची मजल उरणपर्यंत नाही, ते जनाब संजय राऊत आज इराणच्या गप्पा मारत आहेत. इराण प्रकरणात हे करायला पाहिजे होते, ते करायला पाहिजे होते असे सल्ले देणाऱ्या संजय राऊत यांनी आधी उबाठा गटाची काय अवस्था झाली आहे, याचा विचार करावा, अशी बोचरी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते. ज्या पद्धतीने या युद्धामध्ये पाकिस्तानकडून दलाली करण्याचे काम केले जात आहे, त्याचप्रमाणे भारतात पाकिस्तानची दलाली करण्याचे काम संजय राऊत यांच्याकडून केले जात आहे, असा सणसणीत टोला श्री. बन यांनी लगावला.

देशाचा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम आहे. त्यामुळे जगभरात या युद्धाची झळ पोहोचली, पण भारतात त्याचा परिणाम जाणवला नाही. संजय राऊत यांनी इराणच्या गप्पा मारण्याऐवजी आपल्या उबाठा गटाची काय अवस्था झाली आहे, याचा अधिक विचार करावा. तसेच मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांची काय अवस्था झाली आहे, याचाही विचार करावा, असे श्री. बन यांनी सुनावले. दलाली करणे हा संजय राऊत यांचा धंदा झाला आहे. पक्षात त्यांना काहीही काम उरलेले नसल्याने कधी शरद पवारांची, तर कधी राहुल गांधींची दलाली करायची आणि आज तर चक्क पाकिस्तानची दलाली करणाऱ्या संजय राऊत यांनी हे धंदे बंद करावेत. या दलालीमुळेच जनतेने तुम्हाला धडा शिकवला आहे, असेही श्री. बन यावेळी म्हणाले.

ज्या पद्धतीने साप दूध पाजणाऱ्या माणसालाच दंश करतो, अगदी त्याच पद्धतीने या देशाचे मीठ खायचे, या देशात राहायचे आणि देशाविरोधात फणा काढण्याचा प्रयत्न संजय राऊत सातत्याने करतात. ते देशद्रोही भूमिका घेत पाकिस्तानचे कौतुक करतात. या देशाच्या विरोधात भूमिका घेण्याचे आणि पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करण्याचे काम संजय राऊत यांच्याकडून केले जात आहे, असेही श्री. बन यांनी नमूद केले.

श्री. बन म्हणाले की, संजय राऊत ज्या पाकिस्तानचे गुणगान गात आहेत, त्या पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेल साडेचारशे रुपये प्रति लिटर आहे. तिथे गॅस मिळत नाही. नागरिकांना पीठही महाग आहे, आणि अशा पाकिस्तानचे कौतुक संजय राऊत करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व असल्यामुळे येथे ना पेट्रोलचे दर वाढले, ना डिझेलचे दर वाढले.

श्री. बन पुढे म्हणाले, संजय राऊत हे अर्ध्या मताने राज्यसभेवर निवडून आले आहेत. महाराष्ट्रात उबाठा गटाचे फक्त वीस आमदार आहेत. जिल्हा परिषदेत उबाठा गटाला भोपळाही फोडता आला नाही. आधी जिल्हा परिषद आणि येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपले उमेदवार निवडून येतात का ते पाहा, आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला द्या.