रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक योगेश कुमार भस्मे यांना लाच स्वीकारताना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. २३) सायंकाळी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षकाच्या बदली प्रकरणात बदल करण्यासाठी रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणात सुमारे दीड लाख रुपयांच्या लाचेची चर्चा आहे.

भस्मे हे रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात सहाय्यक लेखाधिकारी पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. तसेच ते जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत असल्याचे सांगण्यात येते. शिक्षक बदलीशी संबंधित प्रकरणात वरिष्ठांसाठी रक्कम गोळा केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आल्याचे समजते.

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचला. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताना भस्मे यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे रायगड जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणात नेमकी किती रक्कम मागण्यात आली होती, कोणाकडून ती मागण्यात आली आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकृत कारवाईनंतरच स्पष्टता येणार आहे. शिक्षक बदली प्रक्रियेत आर्थिक व्यवहार होत असल्याच्या आरोपामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या कारवाईबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिकृत निवेदन अथवा गुन्ह्याची सविस्तर माहिती उपलब्ध झाल्यानंतर प्रकरणाचे पुढील स्वरूप स्पष्ट होणार आहे.