चिपळूण : शिवजयंती उत्सवानिमित्त चिपळूण नगर परिषद मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज अशिवस्मारक येथे करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व सजावटीच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप अर्जदार इनायत इब्राहिम मुकादम यांनी केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने चिपळूण नगर परिषदेने जिल्हा सहआयुक्त, नगर परिषद प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्याकडे सविस्तर स्पष्टीकरण सादर केले आहे.
नगर परिषदेच्या म्हणण्यानुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. यामध्ये शिवस्मारकाची संबंधीत सर्वच सजावटीची जबाबदारी मिळकत व्यवस्थापकांकडे सोपविण्यात आली होती.
कार्यक्रमासाठी अत्यल्प कालावधी उपलब्ध असल्याने तातडीने साहित्य व सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. नगर परिषदेच्या वार्षिक नियुक्त ठेकेदारास प्रथम कामाबाबत विचारणा करण्यात आली; मात्र कमी कालावधीमुळे आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे सांगून त्यांनी काम करण्यास नकार दिला. त्यानंतर शहरातील इतर व्यावसायिकांशी चर्चा करण्यात आली. मात्र, कमी वेळेत काम करण्यास कोणीही तयार नसल्याचे नगर परिषदेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर शासनाच्या खरेदी प्रक्रियेतील तरतुदीनुसार प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत कोणतेही बनावट अथवा बोगस दरपत्रक तयार करण्यात आले नसल्याचा दावा नगर परिषदेने केला आहे.
अर्जदाराने हे काम 50 ते 60 हजार रुपयांत होऊ शकते, असा दावा केला होता. मात्र, बाजारभाव, कामाचे स्वरूप आणि आवश्यक साहित्य विचारात घेता एवढ्या कमी खर्चात हे काम होणे शक्य नसल्याचे नगर परिषदेने म्हटले आहे. तसेच मागील तीन वर्षांच्या खर्चाची तुलना केली असता 2026 मधील खर्च तुलनेने कमी असल्याचेही स्पष्टीकरणात नमूद करण्यात आले आहे.