चिपळूण : तालुक्यातील तळवडे-पाते मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळल्याने गुरुवारी सकाळी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दरड हटविण्यासाठी जेसीबी उपलब्ध होण्यास विलंब झाल्याने तळवडे वस्तीची एसटी बस सकाळी 8 ते दुपारी 12 अशह तब्बल चार तास रस्त्यातच अडकून पडली. त्यामुळे बसमधील प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले.
मुसळधार पावसामुळे तळवडे परिसरात अचानक दरड कोसळून रस्ता बंद झाला. गावात तत्काळ जेसीबी उपलब्ध नसल्याने दरड हटविण्याचे काम रखडले. परिणामी दोन्ही बाजूंनी वाहने व एसटी बसही रस्त्यातच थांबून राहिली.
दरम्यान, जेसीबी आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्यावर पडलेली दरड हटविण्यात आली. सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि अडकलेली वाहने पुढे रवाना झाली.
तळवडे येथे रस्त्यावर दरड; एसटी चार तास खोळंबली ;विद्यार्थी, नोकरदारांचे हाल; स्थानिकांच्या मदतीने मार्ग मोकळा..
