चिपळूण : वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने उभारलेल्या विभा अरविंद ग्रंथालयचे उद्घाटन रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शहरात खेंड येथील स्प्रिंग क्लिनिकच्या तळमजल्यावर, जेड गार्डन, स्वरविहार, गणपती मंदिराशेजारी पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीभूषण तानाजीराव चोरगे हे राहणार असून नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लोकप्रिय आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत., तसेच ‘आपलं चिपळूण’चे कार्याध्यक्ष संतोष देशमुख, लोटिस्माचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, घरडा उद्योग समूहाचे आर. सी. कुलकर्णी, वक्ते व प्रवचनकार धनंजय चितळे, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, चिपळूणचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत हेही उपस्थित राहणार आहेत. विभा अरविंद ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामांकित लेखकांच्या पुस्तकांचे दालन चिपळूणमध्ये उपलब्ध होणार आहे. वाचनप्रेमींसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. विशेषतः वृद्ध, महिला, तरुण आणि युवकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश काणे, कार्यवाह विजय कदम आणि कोषाध्यक्ष विनायक ओक यांनी केले आहे.