मुंबई : दिशा सालियन प्रकरणात तिचे वडील न्यायालयात गेल्याने न्यायालयाच्या आदेशाने आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मग यात राजकीय षडयंत्र कुठे आहे? एकीकडे जनाब संजय राऊत म्हणतात की, महायुतीचे सरकार असताना पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला आणि दुसऱ्या बाजूला सांगतात की, राजकीय षडयंत्रातून गुन्हा दाखल केला. षडयंत्र असते सरकारने क्लोजर रिपोर्ट दिला नसता. मात्र आदित्य ठाकरे अडचणीत आल्याने संजय राऊत सर्वाधिक आनंदित झाले आहेत. चौकशीत आदित्य ठाकरे दोषी सिद्ध होऊन राजकीय पटलावरून नाहीसे होत उबाठा गट आपल्या ताब्यात येईल आणि आपण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसू अशी त्यांची इच्छा असल्याचा गौप्यस्फोट भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दिशा सालियन प्रकरणात कोणी दोषी नसेल तर घाबरायचे कारण काय?, असा सवाल करीत श्री. बन म्हणाले, चौकशीतून दूध का दूध, पानी का पानी सिद्ध होईल. मुळात ठाकरे कुटुंबाचे जे काही स्थान आहे, त्याला कुणीही डाग लावण्याचा प्रयत्न करत नाही. उलट ठाकरे कुटुंबाचे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न संजय राऊत हेच करीत आहेत. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून तुम्ही ठाकरे कुटुंबाच्या वैचारिक वारशाला डाग लावला. दिशा सालियन प्रकरणात चौकशीतून सत्य समोर येईल. त्यात आदित्य ठाकरे आणि तुमचे तत्कालीन सरकार दोषी नसेल तर घाबरायचे कारण काय?
श्री. बन पुढे म्हणाले, मतदारसंघ पुनर्र्चनेला ( डीलिमिटेशन) संजय राऊतांच्या पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर किती खासदार वाढणार आहेत? तुमच्या नऊपैकी सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. उरले तीन खासदार एका रिक्षातून फिरतात. त्यापलीकडे तुमची क्षमता नाही. त्यामुळे अशा तीन खासदारांनी डीलिमिटेशन विधेयक मंजूर होणार, अशी भविष्यवाणी करण्याच्या भानगडीत संजय राऊतांनी पडू नये. इन मीन तीन एवढीच अवस्था तुमची आहे. त्यामुळे तुमचा पाठिंबा असला काय, नसला काय, त्याने काहीही फरक पडणार नाही. डीलिमिटेशन विधेयकाला वेगवेगळे राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत आणि डीलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शाह सक्षम आहेत, असे श्री. बन यांनी सुनावले.
‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, असे राज ठाकरे यांनी केलेले ट्विट हे अमित ठाकरे यांच्यासाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा कार्यालयातून फोटो हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची प्रतिमा कमी होत नाही. कारण 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत. हा सल्ला राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना आधी घरी दिलाच होता. आता ट्विटच्या माध्यमातून सार्वजनिकपणे दिला आहे. याआधी पुण्यात फोटो काढला त्याही वेळेला राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना कुठेही पत्रकार परिषद घेऊ दिली नाही किंवा माध्यमांसमोर भूमिका सांगू दिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नादी लागू नका. कावळ्याने कितीही शाप दिले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची प्रसिद्धी, जनतेचा पाठिंबा कमी होणार नाही, हे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि मनसेने मान्य केले असल्यावर श्री. बन यांनी बोट ठेवले.