नवी दिल्ली- राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा) विधेयक २०२६’ ला मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन- गण- मन’ प्रमाणेच समान कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. संसदेने गेल्या महिन्यात ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण कायदा, १९७१’ मध्ये सुधारणा करणारे हे महत्त्वपूर्ण विधेयक बहुमताने मंजूर केले होते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले असून संपूर्ण देशात हा नियम लागू झाला आहे.
1971 च्या राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक कायदामध्ये राष्ट्रीय ध्वज, संविधान आणि राष्ट्रगीताशी संबंधित अवमानासाठी तरतुदी होत्या. मात्र ‘वंदे मातरम्’चा स्पष्टपणे या कायद्यात समावेश नव्हता. 2026 च्या दुरुस्तीमुळे राष्ट्रीय गीतालाही या संरक्षणाच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ यांना राष्ट्रीय सन्मानाच्या दृष्टीने समान वैधानिक संरक्षण मिळाले आहे. दुरुस्तीतील महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय गीताचे गायन जाणीवपूर्वक रोखणे किंवा ते सुरू असताना संबंधित समूहाच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण करणे. अशा प्रकारच्या कृत्यांसाठी तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे ही बाब केवळ प्रोटोकॉलपुरती मर्यादित न राहता आता कायदेशीर चौकटीत आली आहे.
केंद्राच्या गृह मंत्रालयाने 2026 मध्ये राष्ट्रीय गीताच्या गायनासाठी स्वतंत्र प्रोटोकॉल जारी केला आहे. त्यानुसार शाळांच्या दिवसाची सुरुवात राष्ट्रीय गीताच्या समूहगायनाने करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांच्या सकाळच्या सभेत ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मात्र, कायद्यातील दुरुस्तीचा थेट केंद्रबिंदू हा राष्ट्रीय गीताला वैधानिक संरक्षण देणे आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ज्या सरकारी किंवा अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत दोन्ही सादर केले जातील, तिथे आधी ‘वंदे मातरम्’ आणि त्यानंतर ‘जन गण मन’ सादर करण्याचा प्रोटोकॉल निश्चित करण्यात आला आहे. अधिकृत आवृत्तीत ‘वंदे मातरम्’ची सर्व सहा कडवी समाविष्ट करण्यात आली आहेत. या पूर्ण आवृत्तीचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद निश्चित करण्यात आला आहे.