मुंबई – लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक वगळता कुठल्याही विषयावर चर्चा झाली नाही मात्र जवळपास दहा मंत्र्यांची भेट घेऊन आणि निवेदन देत राज्यातील आणि कोकणातील महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभेचे अधिवेशन गेले तीन आठवडे सुरु आहे. या संपूर्ण अधिवेशनामध्ये एक विधेयक वगळता कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकलेली नाही. संसदेत आम्हाला लोकसभा मतदारसंघातील आणि राज्यातील महत्त्वाचे प्रश्न मांडण्याची संधी उपलब्ध होत असते. परंतु यावेळी मात्र ती संधी मिळू शकली नाही. म्हणूनच उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये राज्यातील दिर्घकाळ रखडलेले प्रश्न होते त्यासंदर्भात संबंधित मंत्र्यांना भेटून न्याय मिळतोय का म्हणून प्रयत्न करावा या हेतूने जवळपास दहा केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट आणि मार्गदर्शन घेतले. याशिवाय कोकणवासीयांना जो प्रश्न भेडसावत आहे तो म्हणजे मुंबई – गोवा महामार्गाचे काम रखडलेले असतानाच जे टोलनाके सुरु झालेले आहेत त्यासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी भारत सरकारचे धोरण ६० किलोमीटरच्या अंतरावर टोलनाका असावा मात्र ४० किलोमीटरच्या अंतरावर हे टोलनाके उभारले जात आहेत. याची माहिती दिली या गोष्टीची नोंद गडकरी यांनी घेतली आणि तातडीने सूचनाही दिल्या. याशिवाय दिघी ते पुणे हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गांवर ताम्हाणी घाट आहे या घाटात मधल्या कालावधीत अतिवृष्टीमुळे घाट कोसळला होता. ते काम तातडीने पूर्ण झाले मात्र एक दहा किलोमीटरच्या अंतरात बोगदा केला तर संपूर्ण घाटमाथा निघून जाईल म्हणजे मिसिंग लिंकसारखी व्यवस्था ताम्हाणी घाटात होऊ शकते अशी विनंती केली. त्याचाही डीपीआर बनवण्याचे आदेश गडकरी यांनी दिल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.