दापोली:- दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दापोली तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. याबाबत भाजप तालुकाध्यक्ष जया अजय साळवी यांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
यावेळी माजी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, तालुकाध्यक्ष जया साळवी, दापोली शहराध्यक्ष सचिन होडबे, दापोली ग्रामीण तालुकाध्यक्ष सरचिटणीस संदीप केळकर भाऊ इदाते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत.
उपोषणामध्ये दापोली व मंडणगड तालुक्यातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. दापोली शहरातील गाडीतळ येथील सध्या बंद असलेल्या तालुका स्कूलच्या जागेवर राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दापोलीला ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. मात्र दापोली-खेड आणि दापोली-मंडणगड मार्गांची झालेली दुरवस्था, मोठ्या प्रमाणातील खड्डे तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या चिखलामुळे नागरिक व पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. गणेशोत्सवापूर्वी या प्रमुख मार्गांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा प्रश्न, दापोली नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनासाठी निधी, मंडणगड-शिरगाव एमआयडीसीतील जमीन अधिग्रहणासाठी योग्य मोबदला तसेच दापोली शहरातील नवीन चिकन व मटण मार्केट इमारतीचा प्रश्न यांसह विविध प्रलंबित मागण्याचा समावेश आहे.