सावर्डे : सावर्डे जिल्हा परिषद गटातील ढोक्रवली व पालवण येथील अंगणवाडी शाळांना जिल्हा परिषद सदस्या तथा माजी सभापती सौ. पूजा शेखर निकम यांनी जुनियर अभियंता श्री. महेश आरेकर (चिपळूण) यांच्यासमवेत भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पालवण अंगणवाडी इमारतींची स्थिती, उपलब्ध भौतिक सुविधा व आवश्यक विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
पालवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2 येथील अंगणवाडीची स्थापना सन १९७३ मध्ये झालेली असून इमारत अत्यंत जुनी व जीर्ण झाल्याचे पाहणीत आढळून आले. स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक व संबंधितांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या व प्रस्ताव जाणून घेण्यात आले. या अंगणवाडीच्या दुरुस्तीसह नवीन इमारत मंजूर करण्यासाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करून प्रयत्न केले जातील, असे मत सौ. पूजा शेखर निकम यांनी दिले.
तसेच ढोक्रवली ग्रामपंचायतीत महिला बचत गट, ग्रामपंचायतीच्या विविध सुविधा, गावासाठी भौतिक सुविधांची मागणी व सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी ढोक्रवली व पालवण येथील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.