दापोली : राष्ट्र सेविका समितिच्या ९० वर्षपूर्तीचे औचित्य साधून संपूर्ण कोकण प्रांतामधून घोषवादन विशेष “स्वरतरंगिणी” या कार्यक्रमाचे रविवारी १६ ऑगस्टला आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोकण प्रांतात समाविष्ट एकूण नऊ जिल्हे व एक महानगरातून साखळी पद्धतीने घोषवादन करण्यात आले. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले, दापोली येथील वं. ताई आपटे, द्वितीय संचालिका यांचे जन्मस्थान व कड्यावरचा गणपती देवस्थान येथे संयुक्तरित्या हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ कांचनताई बापट, विश्वस्त, देवस्थान उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ निवेदिता यदमळ, उत्तर रत्नागिरी जिल्हा सह बौद्धिक प्रमुख यांचे उद्बोधन ऐकण्याची संधी उपस्थितांना लाभली.
राष्ट्र सेविका समितीची स्थापनेच्या वेळची सामाजिक परिस्थिती, समितिचा देश तसेच विदेशातील कार्यविस्तार, स्त्री व पर्यायाने समाज सुसंस्कृत व संघटित बनविणे हे समितिचे उद्दिष्ट, वसुधैव कुटुंबकम् हे तत्व लक्षात ठेवून केवळ स्वतःपुरती समिति मर्यादित न ठेवता राष्ट्राप्रति आपली कर्तव्यभावना हवी असे विचार सौ निवेदिताताईंनी आपल्या उद्बोधनात मांडले.
राष्ट्र सेविका समितितर्फे सौ स्मिता आंबेकर, कोकण प्रांत सह व्यवस्था प्रमुख व सौ अपर्णा आठवले, उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यवाहिका उपस्थित होत्या.
राष्ट्र सर्वोपरि हा भाव समाजात रुजवण्यासाठी सक्षम मातृत्व महत्वाचे. तोच उद्देश घेऊन विकसित भारताच्या वाटचालीस पूरक मातृशक्ती जागृत व संघटीत करण्याचे काम राष्ट्र सेविका समिति गत नव्वद वर्षांपासून करत आहे. सेवा, संस्कार, ‘स्वत्व’जागरण या आधारे महिलांमध्ये कार्यरत अखिल भारतीयच नव्हे तर अन्य देशातही सक्षमतेने उभे असलेले हे सांस्कृतिक महिला संघटन आहे. नव्वदावे वर्ष नियमित कामाचा भाग असणाऱ्या “घोष” या विषयाला समर्पित आहे. सांघिकता, समरसता आणि शिस्तपालन यांचा ताल-लयबद्ध मेळ हे घोषवादनाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय शास्त्रीय संगीत व राष्ट्रभक्तीच्या सुरावटींवर आधारित रचनांचे उत्साहपूर्ण वादन सेविकांसहित उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करते. आंजर्ले, दापोली येथे झालेल्या या कार्यक्रमात घोषवादनाचा शेवट जनसेवा ही ईश्वरभक्ती या गीताने झाला. त्यावेळी कार्यक्रमाला १६० उपस्थिती होती.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण “समिति संवाद- कोकण प्रांत” या प्रांताच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात आले होते.