मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीचा, विशेषतः जेंझी प्रेक्षकांचा वेध घेणारा तसेच आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अन्य तांत्रिक माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासन सहभाग घेणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज केली. पू.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या आयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. मराठी चित्रपटांचा दर्जा, गुणवत्ता, नावीन्य आणि अभिनय याबाबत कोणतीही कमतरता नसून व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेल्या ‘कनेक्टिंग लिंक’वर काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
“मराठी चित्रपटांमध्ये गुणवत्ता आणि नावीन्य ठासून भरले आहे. मात्र निर्मितीइतकाच स्क्रीन, वितरण आणि प्रेक्षकवर्ग यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी व्यवहार्य मॉडेल तयार झाल्यास महाराष्ट्र शासन त्यात गुंतवणूकदार म्हणून भूमिका घेईल,” असे ॲड. शेलार यांनी सांगितले.
मराठी चित्रपटांसाठी उपलब्ध स्क्रीनची संख्या, वितरण व्यवस्था आणि नव्या प्रेक्षकवर्गाची निर्मिती या मुद्द्यांवर व्यापक विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दक्षिण भारतीय चित्रपटांना मिळणाऱ्या भावनिक प्रेक्षक प्रतिसादाचा दाखला देत मराठी चित्रपटांसाठीही नव्या पिढीशी भावनिक नाते निर्माण करणारा प्रेक्षकवर्ग विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आधुनिक तंत्रज्ञान हे चित्रपटसृष्टीसमोर आव्हान असले तरी त्याचे संधीत रूपांतर करणे आवश्यक आहे. यासाठी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याची उपयुक्तता आणि आव्हाने यावर प्रात्यक्षिकांसह चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मराठी जेंझी प्रेक्षक अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा, यासाठी मराठी आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मितीमूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण करणे गरजेचे आहे. अशा चित्रपटाच्या निर्मितीचा आर्थिक भार केवळ निर्मात्यांवर पडू नये, यासाठी राज्य सरकारनेही त्यात भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
