चिपळूण : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यम् लॅबोरेटरी, चिपळूण यांच्यातर्फे चिंचनाका, चिपळूण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक रिक्षा मित्र मंडळ चिंचनाका चिपळूण रिक्षाचालकांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात परिसरातील २९ रिक्षाचालकांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.

रिक्षाचालक हे शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना रिक्षा चालकांचे मोलाचे सहकार्य लाभते. रिक्षा चालकांचे आरोग्य चांगले रहावे, रिक्षाचालकांना त्यांच्या आरोग्याबाबत प्राथमिक माहिती मिळावी आणि आवश्यकतेनुसार वेळीच वैद्यकीय सल्ला घेता यावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

या उपक्रमासाठी रिक्षा संघटना, चिंचनाका, चिपळूण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आरोग्यम् लॅबोरेटरीतर्फे या उपक्रम माध्यमातून भविष्यातही नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आरोग्यम् लॅबोरेटरीने राबविलेल्या या उपक्रमाचे रिक्षाचालक अध्यक्ष विनायक रेडिज आणि सर्व रिक्षा चालक यांनी डॉक्टर तेजानंद गणपत्ये यांचे आभार मानले