दापोली : दापोली तालुक्यातील मुर्डी गावात जखमी अवस्थेत आढळलेल्या समुद्री गरुडाची (Sea Eagle) वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका करून त्याला उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले. मुर्डी गावातील ग्रामस्थ श्री. विनय जोशी यांना जखमी समुद्री गरुड आढळून आला. त्यांनी याबाबत तत्काळ परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली यांना माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे कोंगळे बीटचे वनरक्षक प्रभू साबणे, ताडील बीटच्या वनरक्षक शुभांगी गुरव तसेच प्राणीमित्र प्रफुल जोशी यांनी मुर्डी येथे धाव घेतली.

विनय जोशी यांच्या ताब्यात असलेल्या जखमी पक्ष्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर दापोली येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रथमोपचार करण्यात आले. पक्ष्याला पुढील उपचारांची आवश्यकता असल्याने कांदळवन विभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी श्री. निकाळजे यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी समुद्री गरुडाला पुढील उपचारासाठी डहाणू येथे पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, कोणताही वन्यप्राणी किंवा पक्षी अडचणीत अथवा जखमी अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी त्याला स्वतःहून हाताळण्याऐवजी तातडीने वन विभाग दापोली अथवा कांदळवन विभागाशी संपर्क साधावा. यासाठी शासनाचा टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.