मंडणगड : शांतिदूत क्रिकेट संघ देव्हारे यांच्यावतीने 16 ऑगस्ट 2026 रोजी देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला तालुक्यातील विविध व्हॉलीबॉल संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, वेसवी हायस्कूलचे प्राध्यापक राजेश जाधव यांच्यासह शांतिदूत क्रिकेट संघाचे अध्यक्ष सागर तांबे, कार्याध्यक्ष राकेश लोखंडे, उपाध्यक्ष निलेश येलवे, उपाध्यक्ष विशाल तांबे, चिटणीस प्रतीक तांबे, उपचिटणीस संकेत रूके, खजिनदार आदेश जाधव, उपखजिनदार आदित्य येलवे, सल्लागार रोहित तांबे, वसंत तांबे, सुरेंद्र तांबे, प्रमोद दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

स्पर्धेत सहभागी तालुक्यातील विविध संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळविली. चुरशीच्या सामन्यांमुळे स्पर्धेतील रंगत वाढली. या स्पर्धेत भिंगळोली संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, शिपोळे संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, तर बाणकोट संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

शांतिदूत क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळाले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शांतिदूत क्रिकेट संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.