लांजा: सध्या सुरू असलेल्या राज्यातील शिक्षक भरतीमध्ये प्रादेशिक समतोल साधणे आवश्यक आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आपल्या जिल्ह्यातील तरुणांना कोकणात आणून भरती केली आणि स्थानिकांना डावलले तर यावेळी कोकणातून अन्यायाचा भडका उडेल, असा इशारा सामजिक कार्यकर्ते राजन देसाई यांनी दिला.
शुक्रवारी सकाळी लांजा शहरातील हॉटेल एकदंत येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजन देसाई बोलत होते. यावेळी पुढे बोलताना देसाई म्हणाले की, नेहमीच कोकणातील तरुणांवर अन्याय होत असतो. स्थानिकांना डावलून परजिल्ह्यातील उमेदवारांची भरती केली जात असेल तर इथल्या बेरोजगार तरुणांनी करायचे काय? असा सवाल देखील देसाई यांनी उपस्थित केला.
तर नुकत्याच झालेल्या रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत शिक्षक भरतीमध्ये ८० टक्के स्थानिक उमेदवारांना संधी देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी केली असून त्यांची ही मागणी रास्त आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने विशेषतः तरुणांनी या मागणीला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
पुढे देसाई म्हणाले की, १९९५ पूर्वी विभागीय निवड मंडळाची व्यवस्था होती. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा विभागनिहाय मंडळांमार्फत भरती होत असल्याने त्या-त्या भागातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत होत्या. मात्र १९९५ मध्ये ही व्यवस्था बरखास्त करण्यात आली. त्यानंतर साध्या शिपाई पदापासून विविध पदांच्या भरतीतही परजिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळू लागली. निवड मंडळाचा मूळ भावार्थच स्थानिकांना प्राधान्य देणे हा होता. मात्र निवड मंडळे बरखास्त झाल्याने स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. कोकणातील पालक आणि तरुणांनी आता जागरूक होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे.
शिक्षक, शिपाई, तलाठी, ग्रामसेवक, परिचर यांसारखी क आणि ड वर्गातील पदे स्थानिक पातळीवर भरली पाहिजेत. या पदांसाठी एमपीएससीमार्फत राज्यभरातून उमेदवार घेण्याची आवश्यकता नाही. कोकणात डीएड आणि बीएड शिक्षण घेतलेले हजारो तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र बाहेरच्या जिल्ह्यांतील उमेदवारांची भरती होत असेल तर स्थानिक सुशिक्षित तरुण बेरोजगारच राहणार आहेत. त्यामुळे सरकारने शिक्षक भरतीच्या धोरणाचा गांभीर्याने पुनर्विचार करून स्थानिक तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी राजन देसाई यांनी केली आहे.
