लांजा : महाराष्ट्र पोलीस दलात २६ वर्षांची उल्लेखनीय, निष्कलंक आणि आदर्श सेवा बजावणारे लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार आशिष शेलार यांना भारत सरकार गृह मंत्रालय यांच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन २०२६ च्या औचित्याने अती उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
आपल्या संपूर्ण सेवाकाळात प्रामाणिकपणा, व्यावसायिक निष्ठा, कर्तव्यपरायणता आणि उत्कृष्ट तपास कौशल्याच्या जोरावर श्री. शेलार यांनी पोलीस दलाची प्रतिष्ठा उंचावत जनतेचा दृढ विश्वास संपादन केला आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या कारकिर्दीत पोलिस मुख्यालय रत्नागिरी , लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी ग्रामीण, दहशतवाद विरोधी पथक आणि आता पुन्हा लांजा पोलिस ठाणे अशी तब्बल २६ वर्षे आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्ह्याच्या तपासात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे तसेच सर्वसामान्य जनतेला वेळप्रसंगी मदत व मार्गदर्शन केले आहे लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ते लांजा पोलिस ठाण्यात सेवा बजावत असून त्यांच्या या यशाबद्दल पोलिस दलासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
लांजा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस हवालदार आशिष शेलार यांना अती उत्कृष्ट सेवा पदक प्रदान; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सन्मान…
