चिपळूण : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी व युवती सेना, चिपळूण यांच्या वतीने चिपळूण पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच, याच राखीच्या नात्याने चिपळूण शहरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालून तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून वाचविण्यासाठी कठोर आणि प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यानंतर महिला आघाडी व युवती सेना पदाधिकाऱ्यांनी चिपळूण पोलीस उपविभागीय कार्यालयात पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराबाबत सखोल चर्चा केली आणि या गंभीर प्रश्नावर तातडीने प्रभावी पावले उचलण्याची मागणी केली.

यावेळी महिला आघाडी शहर संघटक वैशाली शिंदे, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी निशा बोभस्कर, युवती सेना तालुका अधिकारी तीर्था लाड, नगरसेविका वैशाली कदम, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वंजारे, उप शहर संघटक फिरदोस कवारे, युवतीसेना विभाग अधिकारी मानसी चाळके, विभाग अधिकारी सेजल कदम, दामिनी दळी आदी पदाधिकारी उपस्थित होते

‘नशेचा बाजार’ तरुणाईच्या भवितव्याला धोका

चिपळूण शहरात विविध प्रकारच्या अंमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि सेवन होत असल्याच्या बाबी निदर्शनास येत असून, त्याचा सर्वाधिक धोका शहरातील तरुण आणि विद्यार्थ्यांना आहे. अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रसारामुळे पालकांमध्ये चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या काही तरुणांच्या वर्तनामुळे कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.

व्यसनाधीनतेमुळे तरुणांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भवित्यावर परिणाम होण्याबरोबरच कुटुंबव्यवस्थेवरही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. व्यसनासाठी पैशांची गरज भागविण्याच्या प्रयत्नांतून किरकोळ चोरी, मारामारी अथवा अन्य गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची शक्यता असल्याने हा विषय केवळ एका व्यक्तीच्या व्यसनाचा राहिलेला नसून सामाजिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनत आहे.

छोट्या विक्रेत्यांपुरती कारवाई नको सूत्रधारांपर्यंत पोहोचा!

अंमली पदार्थांचा गैरव्यवहार रोखताना केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. अंमली पदार्थ चिपळूणमध्ये येतात कुठून? त्यांचा पुरवठा कोण करतो? विक्रीचे जाळे कोण चालवते? या व्यवहारामागे मोठे रॅकेट किंवा संघटित टोळी कार्यरत आहे का? या प्रश्नांची उत्तरे तपास यंत्रणेने शोधणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

अंमली पदार्थांच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास करून मुख्य पुरवठादार, विक्रेते आणि या गैरव्यवहारामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पदाधिकाऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रकाश बेले यांनी अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराबाबत पोलिसांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच चिपळूण शहरातील अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराचे संपूर्ण जाळे आणि त्यामागील सूत्रधारांचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यासाठी आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. अंमली पदार्थांचा पुरवठा, विक्री आणि त्यामागील साखळी यांचा सखोल तपास करून या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन गंभीरपणे कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळा-महाविद्यालय परिसरावर विशेष लक्ष द्या

शहरातील शाळा-महाविद्यालय परिसर, तरुणांची वर्दळ असलेली ठिकाणे, संवेदनशील भाग तसेच निर्जन ठिकाणी पोलिसांनी विशेष गस्त व देखरेख वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली. अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारावर नियंत्रण मिळविण्यासाठी गोपनीय माहिती संकलन, तपास, गस्त आणि जनजागृती यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

अंमली पदार्थांचा वाढता प्रसार हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून युवकांचे भविष्य, सामाजिक सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याशी निगडित गंभीर प्रश्न आहे. चिपळूणची सामाजिक व सांस्कृतिक ओळख आणि शांततापूर्ण वातावरण अबाधित ठेवण्यासाठी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

राखीच्या धाग्यातून पोलिसांकडे विश्वासाची मागणी

रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस बांधवांच्या हातावर राखी बांधल्यानंतर महिला आघाडी व युवती सेनेने या नात्याला सामाजिक जबाबदारीची जोड दिली. ‘ही राखी केवळ सणाची परंपरा नाही, तर विश्वास, संरक्षण आणि जबाबदारीचे प्रतीक आहे,’ अशी भावना व्यक्त करत चिपळूणच्या तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून वाचविण्यासाठी पोलिसांनी निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

‘चिपळूणच्या तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून वाचवा, या विषारी व्यापाराच्या मुळापर्यंत जा आणि दोषींवर कठोर कारवाई करा,’ अशी अपेक्षा व्यक्त करत ‘आज रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी म्हणून आम्ही आपल्या पोलीस बांधवांकडे हीच ओवाळणी मागत आहोत. पोलिसांची कडक आणि निर्णायक कारवाई हीच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाची ओवाळणी असेल,’ असा संदेश यावेळी देण्यात आला