ठाणे : कोकणवासीयांसाठी आजचा दिवस मोठा असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते मुंबई विशेष रेल्वे सुरू करण्यात येत आहे. गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून, या काळात मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी जात असतात. त्यामुळे कोकणच्या दिशेने अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
या मागणीची दखल घेत विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सर्व खासदारांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आमदार रवींद्र फाटक यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील सातत्याने पाठपुरावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयाकडे लक्ष घालून कोकणवासीयांच्या रेल्वे सुविधेचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले.