दुबई- आशिया कप २०२६ मधील ग्रुप स्टेजमधील ९ व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेटने पराभव करत विजयाची हंडी फोडली. भारताच्या वाघिणींनी या विजयासह स्पर्धतील आपला सलग तिसरा विजय नोंदवला. आशिया कपमध्ये भारताने सातव्यांदा पराभूत केले. टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तान संघाला ५५ धावांवर ऑल आऊट केले. भारताच्या फिरकीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरूवात खराब झाली होती. पण दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनी सामना जिंकवला.
या सामन्यात पाकिस्तान संघाची कर्णधार फातिमा सना हिने प्रथम फलंदाजी करण्यााच निर्णय घेतला होता. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली, अवघ्या ५५ धावांवरच भारतीय गोलदाजांना त्यांना गुंडाळले. पाकिस्तान संघाने त्यांच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या ठरली, याआधी ५६ होती मात्र आता ५५ धावांवरच त्यांचा डाव आटोपला. पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली होती, कारण चार ओव्हरपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या २२-० होती परंतु पाचव्या ओव्हरपासून पाकिस्तानला झटके बसायला सुरूवात झाली त्यानंतर त्यांना सावरता आली नाही. पाकिस्तानकडून सलामीवार मुनीबा अली १३ धावा आणि शवाल जुल्फिकारच्या १४ धावा सोडल्या तर त्यानंतर कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. कर्णधार फातिमा सनासुद्धा भोपळा फोडू शकला नाही.
भारताकडून श्री चरणी आणि प्रेमा रावल यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेत पाकिस्तान संघाला बॅकफूटवर ढकलले. त्यासोबतच दीप्ती शर्माने २ आणि शेफालीने १ विकेट नावावर केली. पाकिस्तानच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. पाकिस्तानची कर्णधार फातिमाने तीन झटके देत सामन रंगतदार करण्याचा प्रयत्न केला होता. शेफाली वर्मा १२ धावा, स्मृती मानधना ९ धावा आणि प्रतिका रावल हिला ४ धावांवर आऊट केले होते. त्यानंतर मैदानात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अनुभवी दीप्ती शर्मा यांनी विकेटवर थांबून राहत नाबाद २८ धावांची भागीदारी केली आणि विजय खेचून आणला. कर्णधार म्हणून १५०वा सामना खेळणाऱ्या हरमनप्रीतने कडक षटकार मारत विजय साकारला. हरमनप्रीतने नाबाद १८ आणि दीप्तीने नाबाद १४ धावा केल्या.