मंडणगड : देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाजवळ बाणकोट–पंढरपूर प्रमुख राज्य मार्ग क्र. १५ वरील ओढ्यावर असलेला जुना पूल सध्या धोकादायक अवस्थेत असून, या पुलाची तातडीने तांत्रिक व स्ट्रक्चरल पाहणी करून आवश्यक असल्यास जुन्या पुलाच्या जागी नवीन मजबूत पूल बांधण्यात यावा, अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मंडणगड येथील उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. त्यातच पावसाळ्यात ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्याने पुलाच्या संरचनेवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पुलाच्या पिलरमधील स्टील बाहेर आलेले असून, पिलरची झीज झाल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे भविष्यात पुलाला धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे देवळेकर यांनी म्हटले आहे.
सदर पूल हा देव्हारे, वेसवी, बाणकोट तसेच पंचक्रोशीतील अनेक गावांना मंडणगडशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पुलाचे नुकसान झाल्यास नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून अनेक गावांचा संपर्कही बाधित होऊ शकतो.
त्यामुळे पुलाची तातडीने तांत्रिक व स्ट्रक्चरल पाहणी करून त्याच्या सुरक्षिततेबाबत अहवाल तयार करावा. पूल धोकादायक आढळल्यास अवजड वाहतुकीवर आवश्यक निर्बंध घालावेत आणि पूल दुरुस्तीयोग्य नसल्यास जुन्या पुलाच्या जागी नवीन मजबूत व सुरक्षित पूल बांधण्याचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करून काम सुरू करावे, अशी मागणी अभिजीत देवळेकर यांनी केली आहे.
