खेड : कुणबी शिक्षण प्रसारक संस्था, मुंबई संचलित येथील तुकाराम बाबुराव कदम कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पूजा अजित भोसले हिने चिपळूण येथे आयोजित जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून देदीप्यमान यश मिळवले आहे.

चिपळूण येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. दातार विज्ञान, डॉ. बेहेरे कला आणि श्री. पिलुकाका जोशी वाणिज्य महाविद्यालय (डी. बी. जे. स्वायत्त महाविद्यालय) यांच्या हिंदी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदी दिवस’ निमित्त जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या चुरशीच्या स्पर्धेत कु. पूजा भोसले हिने आपल्या उत्कृष्ट व प्रभावी लेखनकौशल्याच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
​तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुणबी शिक्षण प्रसारक संस्था, मुंबईचे अध्यक्ष ॲड. तु. ल. डफळे , सुधीर सीताराम वैराग , सहसचिव द. भि. धुमक , खजिनदार रा. पां. बैकर , नियामक मंडळ सदस्य श्रीकांत तळेकर , भी. म. गोवळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विनोद लक्ष्मी नामदेव साळुंखे आणि हिंदी विभाग प्रमुख डॉ. जावेद शेख यांनी तिचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पूजाच्या या यशाबद्दल सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.