दापोली : कोकणच्या ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ दापोली तालुक्यात रोवली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडने प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी सप्टेंबर २०२६ मध्ये मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे दापोली तालुक्यातील भिवबंदर आणि आघारी येथे तब्बल २८०० मेगावॅट क्षमतेचा मेगा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
या प्रकल्पाची एकूण प्रस्तावित स्थापित क्षमता २८०० मेगावॅट असून, तो दोन टप्प्यांत साकारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १४०० मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी १४०० मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या उभारण्यात येतील. अशा प्रकारे प्रकल्पात एकूण चार अणुभट्ट्या असतील. प्रत्येक अणुभट्टीची क्षमता ७०० मेगावॅट असेल.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जेएसडब्ल्यू एनर्जीकडून तब्बल ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी २२ हजार कोटी, तर दुसऱ्या टप्प्यासाठी २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
प्रकल्पामुळे दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक तसेच बाहेरील तरुणांसाठी सुमारे ८ हजार ते १० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा अंदाज शासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे रोजगारनिर्मिती आणि परिसराच्या विकासाच्या दृष्टीनेही मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.
दापोलीत २८०० मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प! भिवबंदर-आघारी येथे उभारणी; जेएसडब्ल्यू एनर्जीची ४४ हजार कोटींची गुंतवणूक..
