मंडणगड : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रभारी प्रदेश महामंत्री आमदार माधवी नाईक यांनी प्रदेश कार्यकारिणीतील निवडी जाहीर केल्या.

यामध्ये अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी, कोकण विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी चिपळूणच्या प्रणाली सावर्डेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षक पतपेढी हॉल, चिपळूण येथे आयोजित भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठकीदरम्यान अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते व जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रणाली सावर्डेकर यांनी एम.कॉम., बी.एड. पर्यंत शिक्षण घेतले असून शैक्षणिक क्षेत्राची आवड जोपासतानाच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही सक्रिय योगदान देत आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडत आहेत.

यावेळी अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते म्हणाले की, “प्रणाली सावर्डेकर यांनी अल्पावधीतच पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आणि सक्षमपणे पार पाडल्या आहेत. संघटनात्मक कामाची उत्तम जाण, कार्यकर्त्यांशी असलेला संवाद आणि पक्षाच्या विचारांप्रती असलेली निष्ठा ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत. कोकण विभागाची प्रदेश सचिव म्हणून मिळालेली जबाबदारी त्या निश्चितच प्रभावीपणे पार पाडतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती मोर्चाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर म्हणाले की,“प्रणाली सावर्डेकर यांचे पक्षासाठीचे कार्य सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय आहे. सामाजिक क्षेत्रातील कामासोबतच संघटनात्मक जबाबदाऱ्या त्या अत्यंत उत्साहाने पार पाडत आहेत. पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सदस्य नोंदणीपासून विविध संघटनात्मक कार्यक्रमांपर्यंत त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. प्रदेश सचिवपदी कोकण विभागाची जबाबदारी मिळणे हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून त्या कोकणातील अनुसूचित जाती मोर्चाचे संघटन अधिक व्यापक व मजबूत करतील, असा विश्वास आहे.”

प्रणाली सावर्डेकर यांच्या निवडीबद्दल भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कोकण विभागात अनुसूचित जाती मोर्चाचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.