लांजा: (गोविंद चव्हाण)आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुवे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कुवे येथे नुकतीच पार पडली. यावेळी गणेशोत्सव शांततेत व कायदा सुव्यवस्था अबाधित राखून साजरा करण्याचे आईवाहन करण्यात आले.
ही बैठक गुरुवारी रात्री ७ वाजता कुवे येथील डोंगरकर समाज मंदिर येथे पार पडली. या बैठकीस कुवे येथील श्री सत्यनारायण उत्साही मंडळ (मधली उगवतवाडी), श्री रासायन उत्कर्ष मंडळ, (मावळतवाडी) आणि श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ,(डोंगरकरवाडी) या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. एकूण १५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
यावेळी श्रींच्या आगमनापासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या, उत्सवादरम्यान उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणी व त्यावरील उपाययोजना तसेच आवश्यक अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांकाबाबत माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी निर्गमित करण्यात आलेल्या आचारसंहितेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
शासन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कुवे गावातील वरील तिन्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे संकल्प करत लेखी पत्र बैठकी दरम्यान बगळे यांना सादर केले.
सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या चर्चेमुळे बैठक शांततेत पार पडली. कुवे गावातील या तीन मंडळांनी घेतलेल्या डीजे मुक्त गणेशोत्सवाच्या निर्णयामुळे पर्यावरणपूरक आणि शांततापूर्ण गणेशोत्सवाला चालना मिळणार आहे.
