लांजा: माझी वसुंधरा अभियान ७.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत लांजा नगरपंचायतीच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी ईको फ्रेंडली घरगुती गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान होणार असून सहभागी होणाऱ्या गणेशमूर्ती संपूर्ण पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) असणे आवश्यक आहे. तर गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केलेला असावा. सजावटीमध्ये थर्माकोल, पीओपी, प्लास्टिक किंवा अन्य अविघटनशील सजावटीच्या साहित्याचा वापर केलेला नसावा. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता तसेच टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर यासंदर्भातील सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटीला स्पर्धेत विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

सदर स्पर्धा लांजा-कुवे शहर क्षेत्रापुरती मर्यादित असून स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपला अर्ज लांजा नगरपंचायत (नागरी सुविधा केंद्र) येथे११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत फोटोसह जमा करावा. तसेच नेमून दिलेल्या पथकाकडून १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत स्पर्धकांच्या सजावटीची पाहणी करण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. तसेच, स्पर्धेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करणेही आवश्यक आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रु.३,३३३, द्वितीय क्रमांकास रु.२,२२२ आणि तृतीय क्रमांकास रु.१,१११ तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमात लांजा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास हातभार लावावा तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ९८२३४५६९८१ व ९०२८७०६४९० या क्रमांकाशी संपर्क करावा असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.