चिपळूण : कोंकण रेल्वेमध्ये ऑफिस बॉय, खलाशी आणि हेल्पर पदांसाठी १४ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या खुल्या मुलाखतींमधून ३२ बेरोजगार उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने निवड झालेल्या उमेदवारांची केवळ नावे जाहीर केली असून त्यांच्या नावासमोर गाव, तालुका आणि जिल्ह्याचा पत्ता जाहीर केलेला नाही. त्यामुळे हे उमेदवार कोकणातील स्थानिक आहेत की बाहेरील, याबाबत संभ्रम निर्माण झाला असून सर्व उमेदवारांची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी आग्रही मागणी ‘कोंकण रेल्वे अन्याय निवारण समिती’चे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे..
यापूर्वीही अशाच प्रकारे २५ उमेदवारांची भरती करण्यात आली होती. नुकत्याच निवड झालेल्या ३२ आणि पूर्वीच्या २५ अशा सर्व उमेदवारांच्या नावासह त्यांचा पूर्ण पत्ता जाहीर केल्यासच या प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असे मुकादम यांनी स्पष्ट केले..
कोंकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकणातील जनतेने मोठा त्याग केला आहे. त्यामुळे येथील रोजगारावर स्थानिक भूमीपुत्रांचाच पहिला हक्क आहे. स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील उमेदवारांची भरती झाली असल्याचे समोर आल्यास समिती गप्प बसणार नाही, असा इशारा देत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा शौकत मुकादम यांनी दिला आहे..