मुंबई ( प्रतिनिधी ) : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा पोटभाडेकरू असलेला उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. प्रदेश भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच मूळ पक्ष आहेत यावर मतदारांनी लागोपाठ तीनदा शिक्कामोर्तब केले असून त्या पक्षांवर बोलण्याचा अधिकार राऊतांना नाही असे श्री. बन यांनी नमूद केले.

शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अमित शाह यांचा पक्ष झाला आहे अशी पोरकट टीका करणा-या राऊतांना खडे बोल सुनावत श्री. बन म्हणाले की विधानसभा, नगर पालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये उबाठा गटाला शून्यावर समाधान मानावे लागले असून मतदारांनी त्यांचा निकाल लावला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा या नात्याने दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत असतील तर त्यात गैर काय आहे. उद्धव ठाकरे आणि राऊतांना लक्ष्य करत श्री. बन म्हणाले की दिल्लीत राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या दारात याचकासारखे उभे राहण्यापेक्षा सुनेत्राताई स्वाभिमानाने राष्ट्रवादी पक्षाची धुरा सांभाळत आहेत आणि खंबीरपणे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.

राऊतांना भारताच्या प्रगतीमध्ये देखील अधोगती दिसते

राहुल गांधी सातत्याने परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाऊन भारताची मान अभिमानाने उंचावण्याचे काम करतात असे टीकास्त्र श्री. बन यांनी सोडले. परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे म्हणजे देशद्रोह असून राहुल गांधी आणि राऊत देशद्रोही आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवाद्यांसाठी रेड कार्पेट अंथरले जायचे मात्र पंतप्रधान मोदी द्विपक्षीय संबंध दृढ करत देशात परकीय गुंतवणुकीचा ओघ कसा वाढेल या दिशेने धोरण आखणी करत आहेत. मोदी द्वेष आणि भाजपा द्वेषाने पछाडलेल्या राऊतांना भारताच्या प्रगतीमध्ये देखील अधोगती दिसते हे दुर्दैव असल्याचे श्री. बन म्हणाले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची हिंमत असेल तर आणा मात्र त्यावेळी तुमच्या इंडी आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्याशिवाय राहणार नाहीत असा खणखणीत इशारा श्री. बन यांनी दिला. या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने इंडी आघाडी फुटलेली आहे हे लक्षात येईल. सूज्ञ मतदारांनी अविश्वास दाखवत राहुल गांधी आणि उबाठा गटाला धडा शिकवला, त्यांना कोणावरही अविश्वास ठराव आणण्याचा अधिकारच नाही या शब्दांत श्री. बन यांनी टोमणा लगावला.

श्री. बन म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संविधानाला मानत गेली 100 वर्षे चारित्र्यवान पिढ्या बनवण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना विरोध करणा-यांची घरे तोडली गेली होती, वेळोवेळी संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम करण्यात आले होते. देशात आणीबाणी लादून संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम इंदिरा गांधींनी केले होते याची आठवणही श्री. बन यांनी करून दिली. भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार असो की महाराष्ट्रातील महायुती सरकार असो संविधानानुसार चालते तुमच्यासारख्यांच्या बेताल विधानावर चालत नाही अशी प्रखर टीका श्री. बन यांनी केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मातृभाषेवरील वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्यावर टीका करणा-या राज ठाकरे यांना लक्ष्य करत श्री. बन म्हणाले की, भागवत यांच्या वक्तव्याचा इतकाच अर्थ होता की मातृभाषेवर प्रेम करता करता इतर भाषांचा द्वेष करू नका. मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना इतर भाषांचा आपल्या हातून द्वेष होता कामा नये हे महत्वाचे असे श्री. बन यांनी स्पष्ट केले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY