बीड- जालनामधील अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ बीडमधील पाटोदा येथे दाखल झाले. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस, बीड जिल्हाधिकारी यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला. यानंतर आज सकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेऊन सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली. 3 महिन्यात सातारा गॅझेट लागू करा. सरकारला 3 महिन्यांचा वेळ देतो. जर सरकारने धोका दिला, तर आम्ही मुंबई गाठणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. मी आज उपोषण स्थगित करतो, मात्र आंदोलन सुरुच राहणार, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. तसेच मुंबईत गेलेल्या 1 लाख 07 हजार समर्थकांनी माघारी यावं, असं आवाहन देखील मनोज जरांगेंनी केलं.
सरकारच्या शिष्टमंडळाने बीडमधील पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची मनधरणी केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार सुरेश धस, आमदार प्रसाद लाड आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. यानंतर सकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेऊन उपोषण सोडल्याची घोषणा करण्यात आली. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला. या काळात मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही मुंबई गाठणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. उपोषण आज स्थगित करत असलो तरी आंदोलन सुरूच राहणार, असेही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक सतीशकुमार सोळंके यांनी वैद्यकीय पथकासह पाटोदा येथे जाऊन जरांगे पाटील यांची तपासणी केली. त्यांचा रक्तदाब खूप कमी होता. शरीरातील पाण्याची पातळीही कमी झाल्याची माहिती सोळंके यांनी दिली. ‘मी जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. प्रवास टाळून वैद्यकीय उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला,’ असेही सोळंके यांनी सांगितले. दरम्यान, जरांगे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. नारायणगडाचे ह. भ. प.शिवाजी महाराज यांनी विनंती केल्यानंतर आपण त्यांचा मान ठेवून सलाईन घेतले, असे जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्या आहेत. उर्वरित एका मागणीबाबत कायदेशीर अडचण असल्याने तत्काळ निर्णय घेणे शक्य नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुण्यासह राज्यातील नागरिकांची गैरसोय किंवा कायदा-सुव्यवस्थेवर ताण निर्माण होईल, अशी कोणतीही भूमिका घेऊ नये,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जरांगे पाटील यांना केलं होतं.