जळगाव:- दुष्काळावर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी जातीपातीत आणि समाजासमाजात भांडणं लावण्यात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत आदरणीय शरद पवार साहेबांनी मूळ विषयाला हात घातला आहे व सरकारचे लक्ष येणाऱ्या भीषण दुष्काळाकडे वळवले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिली आहे.
ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यावर खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
खडसे सोशल मीडियावर म्हटल्या आहेत की, राज्यात पावसाने दडी मारल्याने मराठवाडा – विदर्भ – खान्देश आणि राज्यातील अन्य भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. यंदा एल निनोचा प्रभाव आहे याची कल्पना सरकारला होती तरीही काहीही ठोस उपाययोजना केली गेली नाही. शेतकऱ्यांसमोर मोठे संकट असताना सरकार मात्र हे संकट पेलवून लावण्यास सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे अशी टीका त्यांनी केली.
शेवटी दुष्काळ आणि अन्य महत्त्वाच्या विषयांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी काही ना काही करतील आपण सावध रहावं असा इशाराही नागरिकांना दिला.