चिपळूण: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर खेंड विभागातील मापारी मोहल्ला परिसरातील रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मशिदीजवळ सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामामुळे रस्त्यावर चिखल, खड्डे आणि बांधकामाचा राडारोडा पसरल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी चिपळूण नगरपरिषद प्रशासनाने या मार्गाची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

खेंड परिसरातील गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका या मार्गावरून जातात. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ होणार आहे. सध्या रस्त्यावर चिखल आणि खड्डे असल्याने महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच ढोल-ताशा पथकांना मिरवणुकीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बांधकामामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस देऊन रस्ता पूर्ववत करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे.

विसर्जनापूर्वी रस्ता सुरक्षित करण्याची मागणी

गणेश विसर्जनापूर्वी नगरपरिषद प्रशासनाने संबंधित रस्त्याची पाहणी करून चिखल व राडारोडा हटवावा, खड्डे बुजवावेत तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी मार्ग सुरक्षित व स्वच्छ करावा, अशी मागणी खेंडवासीयांनी केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची मोठी गर्दी या मार्गावरून होणार असल्याने संभाव्य अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.