दापोली :- दापोली तालुक्यातील हर्णे किनाऱ्यावर गुरुवारी सकाळी एकाच दिवशी ‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉर्पोईज’ प्रजातीचे दोन मृत प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने पर्यावरण आणि सागरी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. हर्णे बंदरातील एम. एम. फिशरीजसमोर एक नर प्राणी मृतावस्थेत आढळला, तर हर्णे बायपाससमोरील समुद्रकिनाऱ्यावर या प्रजातीचे एक लहान पिल्लू मृतावस्थेत वाहून आले.हर्णे कांदळवन विभागाचे प्रमुख फहद जमादार यांच्या निदर्शनास हा प्रकार सर्वप्रथम आला. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती देऊन घटनास्थळी पाचारण केले. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी बंदरात आढळलेल्या मृत प्राण्याचे शवविच्छेदन केले.
दोन्ही प्राण्यांचा मृत्यू सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहांची झालेली दुरवस्था आणि मृत्यूला झालेला मोठा कालावधी यामुळे शवविच्छेदनानंतरही मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती डॉ. लोंढे यांनी दिली. मोठ्या जहाजाचा धक्का लागणे अथवा मासेमारीच्या जाळ्यात अडकणे यामुळे या दुर्मीळ जीवांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदनासह आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मृत प्राण्यांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत खोल खड्डा करून सन्मानपूर्वक पुरण्यात आले.
