मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळून तब्बल १७ वर्षे झाली आहेत. मात्र, आजही या महामार्गावरील अनेक महत्त्वाचे भाग अपूर्ण आहेत. या विलंबाचा थेट फटका कोकणवासीयांसह लाखो प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुरुवातीला ११,४०९.१४ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पाचा सुधारित खर्च १६,९०९.२२ कोटी रुपये इतका करण्यात आला आहे. म्हणजेच मूळ मंजूर खर्चाच्या तुलनेत तब्बल ५,५०० कोटी रुपयांची वाढ, म्हणजेच सुमारे ४८ टक्के खर्चवाढ झाली आहे.
दरम्यान, आतापर्यंत या प्रकल्पावर ११,५७७ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पाच्या मूळ मंजूर खर्चापेक्षाही अधिक रक्कम खर्च झाल्यानंतरही महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
महामार्गावरील अपूर्ण कामे, खड्डे, वाहतूक कोंडी आणि अनेक ठिकाणी असलेले एकेरी मार्ग यामुळे प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरत आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे आणि इतर शहरांमधून कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
एका बाजूला या प्रकल्पाचा खर्च वाढत चालला आहे, तर दुसऱ्या बाजूला महामार्ग पूर्ण होण्याची प्रतीक्षा कायम आहे. १७ वर्षांचा कालावधी, हजारो कोटी रुपयांचा खर्च आणि तरीही महामार्ग अपूर्ण, यामुळे या विलंबाची जबाबदारी नेमकी कोणाची, खर्चवाढीची कारणे काय आणि कोकणवासीयांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोकणाची जीवनवाहिनी म्हणून ओळखला जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.