चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) अडरेच्या अंतर्गत कार्यरत असलेले आयुष्यमान आरोग्य केंद्र, खेर्डी सध्या रेल्वे ब्रिज ते होंडा शोरूमच्या मागील बाजूस सुरू आहे. मात्र हे आरोग्य केंद्र गावाच्या मध्यवर्ती ठिकाणापासून दूर असल्याने सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच आजारी व गरजू रुग्णांना आरोग्यसेवा मिळवताना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आरोग्यसेवा ही प्रत्येक नागरिकासाठी सहज, सुलभ आणि वेळेत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयुष्यमान आरोग्य केंद्र खेर्डी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
याच अनुषंगाने खेर्डीतील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र फाळके, महेंद्र गुरव, अनिल फाळके, संदीप गुरव आणि सुयोग फाळके यांनी प्रथम खेर्डी येथील आयुष्यमान आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांशी चर्चा केली. आरोग्य केंद्राच्या सद्यस्थितीबाबत तसेच गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आरोग्य केंद्र उपलब्ध झाल्यास नागरिकांना होणाऱ्या सोयींबाबत डॉक्टरांकडून माहिती घेण्यात आली. यावेळी डॉक्टरांनीही यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी सौ. ज्योती यादव मॅडम यांची भेट घेऊन चर्चा करण्याची सूचना केली
त्यानुसार सामाजिक कार्यकर्त्यांनी चिपळूण येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात जाऊन तालुका वैद्यकीय अधिकारी सौ. ज्योती यादव मॅडम यांची भेट घेतली. यावेळी खेर्डी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आयुष्यमान आरोग्य केंद्र उपलब्ध झाल्यास गावातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यसेवा अधिक सहज, सुलभ आणि वेळेत मिळू शकेल, अशी भूमिका मांडण्यात आली. तसेच सदर आरोग्य केंद्र गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करण्याची विनंती करण्यात आली.
यानंतर ग्रामपंचायत प्रशासनातील प्रशासक तथा ग्रामसेवक यांचीही भेट घेऊन, ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आयुष्यमान आरोग्य केंद्रासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीला तालुका वैद्यकीय अधिकारी सौ. ज्योती यादव मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला खेर्डी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आयुष्यमान आरोग्य केंद्र असावे, अशी आपलीही इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य जागा उपलब्ध करून दिल्यास सदर आरोग्य केंद्र त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आरोग्यसेवा ही केवळ सुविधा नाही, तर प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे!
गावाच्या एका टोकाला असलेली आरोग्यसेवा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आली, तर ती केवळ एका इमारतीचे स्थलांतर ठरणार नाही; तर ज्येष्ठ नागरिकांच्या पावलांना आधार, महिलांना सुरक्षितता, लहान मुलांना वेळेवर उपचार आणि गरजू रुग्णांना तातडीची आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळेत आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आरोग्य केंद्र उपलब्ध झाल्यास खेर्डीतील नागरिकांसाठी ही मोठी आणि अत्यंत उपयुक्त आरोग्यसुविधा ठरणार आहे.
आता ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन योग्य जागा उपलब्ध करून द्यावी आणि खेर्डीकरांच्या या रास्त व लोकहिताच्या मागणीला मूर्त स्वरूप द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
आयुष्यमान आरोग्य केंद्र गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
