रत्नागिरी : राज्यातील अनेक भागांत अनियमित व खंडित पावसामुळे शेतीपिकांवर परिणाम होत असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘शेतकरी मदत केंद्र’ सुरू करण्याच्या दिलेल्या निर्देशानुसार रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी केले आहे.

प्रत्येक तालुका व महसूल मंडळाच्या स्तरावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी ‘शिवसेना शेतकरी मदत केंद्र’ सुरू करावे. या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची माहिती संकलित करणे, पंचनाम्याची प्रक्रिया समजावून सांगणे, आवश्यक अर्ज व कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करणे, पीकविमा तसेच शासनाच्या उपलब्ध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, अशी कामे करण्यात यावीत, असे दत्ता कदम यांनी सांगितले.

तसेच प्रत्येक तालुका प्रमुखाने संबंधित तहसीलदारांना निवेदन देऊन आपल्या तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने प्रशासकीय पाहणी करावी, गावनिहाय पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे शासनाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी करावी.

शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार शासनाच्या लागू नियमांप्रमाणे तातडीची आर्थिक मदत, पीकविमा, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था तसेच इतर आवश्यक सवलती मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात यावी.

“हे काम केवळ निवेदन देण्यापुरते मर्यादित राहू नये. शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवून प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत शिवसैनिकांनी सातत्याने पाठपुरावा करावा. शेतकरी संकटात असताना शिवसेना त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,” असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी केले.