जळगाव : सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा शेतकऱ्यांना किंचितही फायदा होणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दुष्काळाबाबत सरकारने काढलेल्या परिपत्रकावर दिली आहे.

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर याबाबत सविस्तर लिहिले आहे. त्या म्हणाल्या की, आज राज्यावर दुष्काळाचे मोठे संकट समोर असताना, शेतकऱ्यांचे आयुष्य पणाला लागले असताना कुठल्याही अटी आणि शर्तींशिवाय दुष्काळाची घोषणा होईल असे वाटले होते मात्र सरकारने नेहमी प्रमाणे निकष, नियम, अटी आणि शर्ती लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे अशी टीका करत असतानाच त्यांनी सांगितले की, २०२४ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी पक्षाने कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. एकदा नाही तर तीनदा तीनदा सातबारा कोरा.. कोरा.. कोरा.. करू म्हणाले होते. सातबारा खरंच कोरा होणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं पण सरकारने मागे जी कर्जमाफी केली त्यात अनेक अटी आणि शर्ती घातल्या परिणामी त्या कर्जमाफीचा महाराष्ट्रातील निम्म्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नाही. आज सरकारने दुष्काळाबाबत जो जीआर काढला आहे, त्याचीही तीच गत आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही असे त्यांनी नमूद केले आहे.

सरकारचा जीआर म्हणतो कर्ज पुनर्गठन करू, म्हणजे कर्जमाफी नाहीच. ३३.५% वीजबिल सवलत म्हणजे संपूर्ण दिलासा नाही. हेक्टरी ५० हजार रुपयांची मागणी असताना जीआरमध्ये त्याबाबत कोणताही उल्लेख दिसत नाही. सरकारने गोल गोल न फिरवता स्पष्ट सांगावे की २५९ दुष्काळग्स्त तालुक्यांतील किती शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळणार? किती निधी उपलब्ध आहे? DBT कधी होणार? Trigger-2 चे मूल्यांकन कधी पूर्ण होणार? दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. मागील तीन महिन्यांचीच आकडेवारी पाहिली तर जवळपास ७१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार आणखी किती शेतकऱ्यांचे बळी पाहिजे आहेत ? सरकारने शेतकऱ्यांचा अंत बघू नये. शरद पवार साहेबांनी केलेल्या मागणीप्रमाणे सरकारने तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, विद्यार्थ्यांचा फक्त परीक्षा शुल्क माफ न करता संपूर्ण वर्षाची फी माफ करावी अशी मागणी करत असतानाच सरकार जर वेळकाढूपणा करत असेल आणि त्यात आणखी शेतकऱ्यांचे जीव जात असेल तर सरकारच्या इतर कोणत्याही मदतीला काय धरून चाटायचे का ? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.